नाशिक (वृत्तसंस्था) जळगाव जिल्हा परिषदेच्या चाळीसगाव तालुका बांधकाम उपविभाग अभियंत्यास चार लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी नाशकातून अटक करण्यात आली होती. संशयिताच्या धुळे येथील घरझडतीत सुमारे २७ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह विविध बँकाचे पासबूकही एसीबीच्या हाती लागले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (वय ५७, रा. अशोकनगर, धुळे) असे संशयित लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. नाशिक येथील तक्रारदाराने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा परिषदेच्या चाळीसगाव तालुका बांधकाम उपविभागांतर्गत पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.
तडजोडीअंती ठरले चार लाख रुपये !
या कामाच्या देयकापोटीचे चार कोटी ८२ लाख रुपये आणि कामाच्या अतिरिक्त सुरक्षा अनामतपोटीचे ३५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी संशयित अभियंता विसपुते यांची भेट घेतली. यावेली विसपुते याने या कामाच्या मोबदल्यात पाच लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती हा व्यवहार चार लाखावर निश्चित करण्यात आला. मात्र, तक्रारदाराने याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसबीने पडताळणी करून शनिवारी (दि. १६) रात्री विसपुते यास गडकरी चौक परिसरात सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून न्यायालयाने विसपुते यास बुधवार (दि.२०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घर झडतीत आढळले २७ तोळे सोने !
एसीबीने संशयित ज्ञानेश्वर विसपुते याच्या घराची झडती घेतली असून त्यात २७ तोळे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. याबरोबराच अनेक बँकाचे पासबुक मिळून आल्याने एसीबीने स्थावर व जंगम मालमत्तांसह बँक ठेवी आणि लॉकरवर लक्ष केंद्रीत केले आहे. वेगवेगळ्या पथकांकडून अपसंपदाचा शोध घेतला जात असून, विविध बँकामध्ये झाडाझडती सुरू केली असल्याचे कळते.