तेल अविव (वृत्तसंस्था) कोरोनामुक्त झाल्यानंतर इस्रायलमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत हजारो नागरिक जखमीही झाले आहेत.
माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो. यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात. या दरम्यान नृत्याचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. हजारो लोक यासाठी उपस्थित राहिले. ही गर्दी आटोक्यात आणता आली नाही आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीमुळे ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.
इस्रायल हा जगातील पहिलाच देश आहे जो कोरोनामुक्त झाला आहे. इस्त्रायलमध्ये सर्वाधिक प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे त्या देशात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या देशातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून मास्कचा वापरही बंद केला आहे.