नाशिक (वृत्तसंस्था) वडिलांकडे आइस्क्रीमचा हट्ट करत भरपावसात दुकानात गेलेल्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा मेडिकल दुकानातील फ्रिजला हात लागून शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्ती चौक, उंटवाडी रोड येथे घडली. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी असे मृत मुलीचे नाव आहे.
विशाल कुलकर्णी गुरुवारी रात्री आइस्क्रीम घेण्यासाठी मुलीला साेबत घेऊन गेले. ग्रीष्मा ही फ्रिजला हात लावून उभी राहत आइस्क्रीम पाहत होती. या वेळी फ्रिजच्या खाली असलेल्या वायरचा तिला शॉक लागला आणि ती खाली कोसळली. कुलकर्णी यांनी तिला लगेच रुग्णालयात नेले. मात्र, तिची हालचाल पूर्णपणे बंद झाल्याने व ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे बघून त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. परंतु, जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. फर्स्ट केअर फार्मा या दुकानाील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने दुकानदारावर कारवाईची मागणी होत आहे.