अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले. तसेच शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल अशी माहिती आ. अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ५२ गावातील ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. त्या शेतकऱ्यांना अनुदानातून वगळण्यात येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना कर्ज मुक्तीचा लाभ मिळेल. आता अनुदान प्राप्त झालेले २० गावातील शेतकरी जुलै २०१९ च्या अतिवृष्टीत बांधीत (नुकसानग्रस्त) झाले होते, तर सप्टेंबर २०१९ मध्ये ३२ गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते, महसूल विभागामार्फत एकूण ५२ गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर या संपूर्ण ५२ गावातील शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी अनिल पाटील यांचे शासन दरबारी सतत प्रयत्न सुरू होते. अखेर शासनाने यास मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात जुलै २०१९ च्या अतिवृष्टीतील २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून उर्वरित ३२ गावातील शेतकऱ्यांना देखील लवकरच सात कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. शासनाच्या निकषानुसार बिगर कर्जदार म्हणजेच ज्यांनी पीक कर्ज घेतले नसेल किंवा थकबाकीदार असतील अश्या शेतकऱ्यांचा अनुदानात समावेश असून त्यांना १ हेक्टर पर्यंत २०४०० याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल म्हणजे नियमित कर्जदार असतील त्यांना सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत १ हेक्टर पर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे आ. अनिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान संपूर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कोणत्याही मार्गाने मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून आपण अनेक महिन्यापासून अतिशय जोमाने यासाठी पाठपुरावा करीत होतो. आज २० गावांना न्याय मिळाल्याने हे पहिले यश आहे, यामुळे कोणी काहीही अफवा पसरवीत असतील अथवा दिशाभूल करीत असतील तर त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका फक्त संयम ठेवा न्याय सर्वाना मिळणारच असा दावा आ. अनिल पाटील यांनी केला आहे. ५ कोटी अनुदान प्राप्त- जुलै २०१९ मधील अतिवृष्टीमुळें बाधित २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून सप्टेंबर २०१९ मध्ये बाधित झालेल्या ३० गावातील शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्राप्त व्हायचे आहे. प्राप्त ५ कोटी अनुदान लवकरच शेतकऱ्यांना वितरित केले जाईल.