नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देणारा जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. काही लोक काहीही मेहनत न करता अचानक श्रीमंत होतात मात्र, काही लोक आपला प्रामाणिकपणा सोडत नाहीत. सध्या असंच एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला तब्बल सात कोटी रुपयांचा खजिना सापडला होता. परंतु त्याने तो पोलिसांच्या हाती सोपवला. या खजिन्यात ३० किलो अंमली पदार्थ होते.
एक व्यक्ती भल्या पाहाटे जॉगिंग करण्यासाठी फ्लोरिडामधील समुद्रकिनारी गेला होता. त्यावेळी पाण्यात तरंगणारी अनेक पाकिटं त्याला दिसली. त्यापैकी जमेल तेवढी पाकिटं त्याने गोळा केली. अन् ती पाकिटं कोणाची आहेत? कोणाचा पत्ता वगैरे त्यावर आहे का? हे तपासून तो पाहू लागला. परंतु ती सीलबंद होती. त्यामुळे मग त्याने त्या सगळ्या पिशव्या गोळा करून पोलिसांच्या हवाली केल्या. पोलिसांनी तपासण्यासाठी ती पाकिटं फोडली अन् त्यामध्ये जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.
या सीलबंद पाकिटांमध्ये अंमली पदार्थ होते. त्या व्यक्तीने तब्बल ३० किलो अंमली पदार्थ गोळा करून पोलिसांच्या ताब्यात सोपवले होते. अर्थात त्याला याबद्दल काहीच माहित नव्हतं. परंतु त्याने ते पाकिट खोलून देखील पाहिलं नाही. या ड्रग्सची किंमत बाजारात जवळपास साडे सात कोटी रुपये इतकी आहे. जर त्याने हे ड्रग्स विकले असते तर तो रातोरात करोडपती झाला असता. मात्र त्याने असं कुठलंही कृत्य केलं नाही. त्यामुळे फ्लोरिडा पोलिसांनी देखील त्याचं तोंड भरून कौतुक केलं.