जळगाव (प्रतिनिधी) शेतजमीनीच्या व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पियुष कमलकिशोर मणियार (वय २६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांमध्ये फसणूक केली. ही घटना दि. २८ डिसेंबर २०२३ ते दि. १४ जून दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दलाल धिरज विजय पाटील (रा. रिंगरोड) याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यवहारापोटी ७० लाख ४८ हजार रुपये दिले !
शहरातील बांधकाम व्यावसायिक पियुष मणियार यांना शेतजमीन घ्यायची असल्याने त्यासाठी त्यांनी रियल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकऱ्याची शिरसोली प्र.बो. येथील गट क्र. २२३/३मधील शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले. मणियार यांना ती शेतजमीन आवडल्यामुळे दलाल धिरज पाटील यांच्या मध्यस्तीने मणियार व शेतकरी पाटील यांच्यात सदर जमिनीचा व्यवहार ९० लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार मणियार यांनी आरटीजीएस व रोखीने वेळोवेळी एकूण ७० लाख ४८ हजार रुपये दिले होते. यामध्ये सदर व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी धीरज पाटील याची असताना त्याने रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्याला आणले नाही तसेच रक्कमदेखील परत दिली नाही.
दोन दिवसांची पोलीस कोठडी !
गुन्हा दाखल होताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित धिरज विजय पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे करीत आहे.
जमिन नावावर करत नसल्याने गुन्हा दाखल !
व्यवहार पूर्ण होत नसल्याने मणियार यांनी शेतकरी पाटील यास बोलवले असता एजंट पाटील याने पैसे दिले नसल्याने खरेदीखत करून देता येणार नाही, असे शेतकऱ्याने सांगितले. शेतजमीन खरेदी करुन न देता व दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक केली म्हणून मणियार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र शांताराम पाटील व धीरज विजय पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.