मुंबई (वृत्तसंस्था) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering) अटकेत असलेल्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन नाकारला असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत सुनावण्यात आलेल्या ईडी कोठडीत आता ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायायातील विशेष पीएमएलए न्यायलयाने पाच दिवसांची कोठडी नवाब मलिक यांना वाढून दिली आहे. तपास यंत्रणेने सहा दिवसांची कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंतची कस्टडी दिली आहे. पहिल्यांदा न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती, त्यात २५ ते २८ फेब्रुवारी असे तीन दिवस नवाब मलिक प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या तीन दिवसात चौकशी होऊ शकली नाही. त्याच बरोबर तपासातून जी नवीन माहिती पुढे आली आहे, त्यात काही साक्षीदारांनी सांगितलं की, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध होते, असा युक्तिवाद करत ईडीने न्यायालयात मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात मागणी केली होती. या युक्तिवादानंतर चौकशीचे जे तीन दिवस वाया गेले होते, त्यासाठी नवाब मलिक यांच्या कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली.
ही राजकीय हेतूने करण्यात आलेली कारवाई, मलिक यांच्या वकिलांचा दावा
नवाब मलिक यांच्याकडून वकील अमित देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ते म्हणाले, मागील रिमांड आणि आताच्या रिमांडमध्ये अधिक फरक नाही. देसाई न्यायालयात म्हणाले की. मागच्यावेळी ईडीने सांगितले होते की, नवाब मलिक आणि त्यांच्या कंपनीने हसीना पारकर हिच्याशी ५५ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. मात्र आज ईडीने न्यायालयात सांगितलं की, हा व्यवहार ५५ लाखांचा नसून ५ लाखांचा होता. जर या गोष्टीवरून ईडीमध्येच गोंधळ आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांना तुरुंगात जावं लागत. तर ही राजकीय हेतूने करण्यात आलेली कारवाई असल्याचा युक्तिवाद देसाई यांनी न्यायालयात केला.
















