यावल (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी जळगावात सभा होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील यंत्रणा अलर्टवर आहे. अशा स्थितीतही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील साकळी गावात मुस्लिम कब्रस्तान जवळ महसूल विभागाच्या गस्ती पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करताना ट्रैक्टर पकडले होते. या पथकावर हल्ला करून हे ट्रैक्टर पळवून नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ट्रॅक्टर मालक, वाहनावर चालकाने शासकीय दगड महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण केली. अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच. १९-सी व्ही. ०५७८) डांभुर्णी गावाजवळ नाल्यामध्ये पकडण्यात आले होते. महसूल पथक हे ट्रैक्टर घेऊन यावलला येत होते.
दरम्यान, साकळी गावाजवळ मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी मधुराजे पाटील, कोतवाल विकास सोळुंके यांना रस्त्यात अडवून ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके (रा. कोळन्हावी) यांनी वाद घातला. मंडलाधिकारी जगताप यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण केली. त्यात मंडळाधिकारी जगताप यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यांनंतर त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले. पथकाने पाठलागाचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या वाहनावर दगड भिरकण्यात आले. घटनेची माहिती यांच्या मिळतात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी पोलिस ठाणे गाठले. तर मंडळाधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एकदिवस वाळू माफिया चक्क महसूलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करतात, हे बाब चिंताजनक आहे.