जळगाव (प्रतिनिधी) सोन्याची अंगठी घेण्यासाठी आलेल्या महिलेने बनावट अंगठी ठेवून दुकानातून ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी १ लाख ४० हजार रुपयांची अंगठी चोरुन नेली. ही घटना शहरातील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. दुकानात उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रिंगरोडवर असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. या सुवर्णपढीमध्ये गिरीश दिवाकर डेरे (वय ३४) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. ३० रोजी त्यांना अंगठी काऊंटरवरील सेल्समन सचिन धनगर यांनी त्यांच्या महिला सहकारी सीमा सुर्वे या ग्राहकांना अंगठी दाखवित असतांना त्यांना त्यामधील १ अंगठी डुप्लीकेट असल्याचे समजले. त्यांनी लागलीच सर्व अंगठ्यांचे बारकोड स्कॅन केल्यानंतर त्यांना १०. ७३० मिली ग्रॅमची अंगठी चोरी झाल्याचे समजले. त्यांनी हा प्रकार मॅनेजर डेरे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लागीलीच दि. २७ रोजीचे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
अंगठी पाहतांना केली हातचालाखी
फुटेजमध्ये दि. २७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास एक महिला दुकानात अंगठी पाहत होती. त्या महिलेने खरी अंगठी चोरुन नेत त्या जागेवर खोटी सोन्यासारखी दिसणारी अंगठी ठेवतांना दिसून आली.
फुटेजनुसार गुन्हा दाखल
अंगठी चोरी करतांना महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने मॅनेजर डेरे यांनी लागलीच पुणे येथे मुख्य ऑफिसमध्ये कळविले. वरिष्ठांनी झालेल्या प्रकाराबाबत कायदेशीर तक्रार देण्यास सांगितल्यानंतर दि. १ रोजी मॅनेजर डेरे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चोरी करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोहेकॉ सुवर्णा तायडे या करीत आहे.
















