धरणगाव (प्रतिनिधी) “ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक धरणगाव शहराच्या प्रवेशद्वारी उभारण्यात यावे,” अशी मागणी शहरातील महिलांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील धरणगाव-जळगाव रस्त्यावर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीजवळ, स्व. यादवराव अण्णांच्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत हे स्मारक उभारण्यात यावे, अशी स्पष्ट विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले यांनी केलेले समाजकार्य, विशेषतः महिलांच्या शिक्षणासाठी केलेला लढा, आजच्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्याची आठवण राहावी आणि पुढील पिढ्यांना दिशा मिळावी, या हेतूने हे स्मारक उभारले जावे, अशी भावना या महिलांनी निवेदनातून व्यक्त केली.
या वेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या महिलांमध्ये सौ. संगीता संजय महाजन, सौ. पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन, सौ. उषाताई गुलाबराव वाघ, सौ. सुरेखाताई विजय महाजन, सौ. अंजलीताई भानुदास विसावे, सौ. कल्पनाताई विलास महाजन, सौ. संगीताताई चंदन पाटील, सौ. मनीषा कैलास माळी, सौ. प्रमिलाताई मधुकर रोकडे, सौ. सरलाताई सुरेश सावकारे, सौ. संगीताताई विनोद माळी, सौ. संगीताताई देवालाल माळी, सौ. भारतीताई हेमंत चौधरी, सौ. सुनीताताई संतोष लिंडायत, सौ. कविताताई रमेश महाजन, सौ. उषाताई मनोज चौधरी, सौ. रिटाताई भागवत यांचा समावेश होता.