जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्यात अनेक दिव्यांग बालकांना घरीच राहावे लागत आहे. दिव्यांग बालकांचे पालक देखील घरीच असून कुटुंबाच्या खाण्यापिण्याची अडचण होत आहे. शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्ब बायव्ह्यूतर्फे जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.
दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, बाळू चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, अनिता पाटील, सोनाली भोई, लक्ष्मी वाघ, वनिता पवार आदी उपस्थित होते.
उर्वरित किराणा किट शिरसोली, चाळीसगाव येथील बालकांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले आहेत. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यू व श्यामश्री भोसले यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. लॉकडाउन काळ असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्टचा समावेश आहे.