क्षुल्लक वादातून प्राणघातक हल्ल्यासह रोकड लांबवली
धुळे (प्रतिनिधी) अंगावर भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मार, असे सांगितल्याच्या कारणावरुन क्षुल्लक महिलेसह कुटुंबियांना कोयत्याने मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच रस्त्यात वाहन अडवून एकावर प्राणघातक हल्ला करुन १० हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून घेतली. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात १८ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, छायाबाई संजय मराठे (४६) रा. मालपूर रोड, खडवा नाला, रोटरी इंग्लीश स्कूलजवळ दोंडाईचा, यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आदित्य संजय पवार याचा कुत्रा छायाबाई मराठे यांच्या जेठच्या अंगावर भुंकल्याने त्यांनी कुत्र्याला दकड मार असे सांगितले. याचा राग आल्याने आदित्य पवार याच्यासह इतरांनी गैरकायद्याची मंडळी जमवून छायाबाई मराठे यांच्यासह कुटुंबियांना कोयत्याने मारण्याची धमकी दिली. तसेच याच कारणावरुन छायाबाई मराठे यांच्या पतीचे वाहन रस्त्यात अडवून त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. तसेच त्यांच्याजवळील १० हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले. यावरुन आदित्य पवार, संजय अशोक पवार (४५), मिनाक्षी संजय पवार (३६), पंकज अशोक पवार (४२), पंकज पवार याची पत्नी (नाव माहित नाही), घनश्याम शिंपी (३२), सागर शिंपी (३०), पंकज पवार याची आई, तसेच ८ ते १० अनोळखी व्यक्ती रा. रोटरी इंग्लीश स्कूलजवळ, दोंडाईचा, या १८ जणांविरुध्द जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.