जालना (वृत्तसंस्था) सासरच्यांनी गरोदर असलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना जाफराबाद तालुक्यातील सिध्दी येथे २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. खून केल्यानंतर मयत महिलेने गळफास घेतल्याचा बनाव तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, हुंड्यात राहिलेले ५० हजार रुपये न दिल्याने खून केल्याचेही समोर आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, देऊळगाव मही येथील रविशंकर शांताराम डिघे यांच्या मुलीचा विवाह मागच्या वर्षी जाफराबाद तालुक्यातील सिध्दी येथील सखाराम लोखंडे याच्यासोबत झाला होता. लग्नावेळी रविशंकर डिघे यांनी दिलेल्या हुंड्यातील रकमेचे ५० हजार रुपये बाकी राहिले होते. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसांनी संशयित आरोपी पती सुखराम महादू लोखंडे, लक्ष्मण महादू लोखंडे, मंगलाबाई महादू लोखंडे (रा. सिध्दी) यांनी निकिताच्या मागे हुंड्याचे राहिलेल्या पैशांचा तकादा लावला.
याच काळात निकिता ही गरोदर राहिली. पण तरी देखील पैशांसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. २६ एप्रिल रोजीही हुंड्यावरून त्यांच्यात वाद झाला. तिन्ही संशयितांनी निकिता हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव केला. परंतू याप्रकरणी रविशंकर डिघे यांच्या फिर्यादीवरून संशयित सुखराम महादू लोखंडे, लक्ष्मण महादू लोखंडे, मंगलाबाई महादू लोखंडे (रा. सिध्दी) यांच्याविरूध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवघ्या ५० हजारसाठी गर्भवती विवाहितेचा गळा आवळून खून केल्यामुळे समाजमन सुन्न होत, संतापाची लाट उसळली आहे.