पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील हॉटेल सायली जवळील पेट्रोल पंपाजवळ एका मालवाहू छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २१ रोजी घडली. मधुकर बाबुराव चावडे (वय ६५ रा.सतखेडा ता धरणगाव), असे मयताचे नाव आहे.
या संदर्भात मंगल तुंबड पाटील (वय ५९ धंदा-शेती रा. सतखेडा ता. धरणगाव), यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयत मधुकर चावडे हे त्यांच्या हिरोहोंडा मोटार सायकल क्रमांक (एम एच -१५ /ए.टी ८४५८) पिप्री गावातून जात होते. त्याचवेळी हॉटेल सायली जवळील पेट्रोल पंपाजवळ पाठी मागून रविंद्र देविदास बारी (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) या चालकाने यांनी त्याच्या ताब्यातील मालवाहू TATA ACE क्रमांक (MH-१९/९-९४८१, छोटा हत्ती) ही भरधाव वेगात व हयगईने चालवून त्याच्या पुढे चालत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मधुकर चावडे हे मोटार सायकलसह खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच मयत झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.