छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) येवला आगाराच्या भरधाव एसटी बसने मोटारसायकलला जोराची धडक देत १०० फुटांपर्यंत फरपटत नेल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची हृदयद्रावक घटना खंडाळा (ता. वैजापूर) येथील मुख्य चौकात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. शेख मुस्ताक शेख रज्जाक (वय ४५, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे मृतकाचे नाव आहे. तर वैजापूर पोलिसांनी बसचालक सतीश अशोक जमधडे याला ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात अधिक असे की, बसचालक सतीश जमधडे हे येवला आगाराची बसने छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जात होते. शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता खंडाळा येथे बस आली. या वेळी मुख्य चौकातून शेख मुस्ताक शेख रज्जाक हे आपल्या दुचाकीने रस्ता ओलांडत होते. याचवेळी बसने दुचाकीला जोराची धडक देत दुचाकी चालकाला शंभर फुटांपर्यंत फरपटत नेले.
यामुळे मुस्ताक शेख यांचा ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल खंडाळा केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेख मुक्तार यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच खंडाळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी बसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक झाल्याची घटना घडली. याबाबतचे वृत्त एका वृत्तपत्राने आज प्रकाशित केले आहे.