चाळीसगाव (प्रतिनिधी) : दुचाकीने जात असलेल्या विद्यार्थीनीच्या दुचाकीला डंपरने जोरात धडक दिली. वाळूने भरलेल्या या अपघातात दुचाकीस्वार चंचल नामदेव लांडगे (वय १९) या डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास
दसेगाव फाट्याजवळ घडली. चाळीसगाव येथे राहणारी चंचल लांडगे ही डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ती तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी हीच्यासोबत दुचाकीने दसेगाव फाट्याजवळून जात होती. यावेळी भरधाव वेगाने वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चंचल लांडगे हीचा दुर्देवी मृत्यू झाला तर तिची मैत्रीण वैष्णवी ही गंभीररित्या जखमी झाली. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैष्णवी हीच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताच्या घटनेनंतर
परिसरात मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
संतप्त नागरिकांचा रास्तारोको
भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.














