जळगाव (प्रतिनिधी) राज्यासह मध्यप्रदेशातील गुन्ह्यांमध्ये फरार असलेला तसेच एमपीडीएच्या कारवाई झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. हा फरार असलेला सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (वय ३२, रा. असोदा, ता. जळगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील थेरगांव येथून मोठ्या शिताफिने अटक केली.
महाराष्ट्रात जबरी चोरी, हाणामारीसह मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मोटार सायक्ल चोरीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेला योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्याविरुद्ध सुमारे पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई देखील करणयात आली होती. तेव्हापासून सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे हा फरार होता. या संशयिताला ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या होत्या.
दरम्यान, हा संशयित पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी जितेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षकांनी पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील व ईश्वर पाटील यांचे पथक अहमदनगर व पुणे रवाना केले. सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे हा जळगावातून पसार झाल्यानंतर तो कामानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेल्या मित्रांसह नातेवाईकांकडे तो ओळख लपवून राहत होता. तसेच तो पसार झाल्यापासून मोबाईल देखील वापरत नसल्याने पोलिसांना त्याचा तपास लागत नव्हता.
भर पावसात मोठ्या शिताफीने घेतले ताब्यात
योगेश कोल्हे हा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगांव येथे असल्याचे कळताच पथकाने भरपावसामध्ये सापळा रचून पहाटेच्या सुमारास संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयित हा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात देखील सहभागी होता. तसेच तो अनेक गुन्ह्यांमध्ये मुख्य सूत्रधार असल्याने त्याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली होती. पथकाने जळगावात आल्यानंतर त्याला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.