धुळे (प्रतिनिधी) विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना दुचाकीवर दोन जणांच्या अंगावर अचानक कडू निंबाचे झाड कोसळल्याने माध्यमिक शिक्षक वैभव वसंत दशपुते (वय ३७, रा. विद्यानगर, पिंपळनेर) हे जागीच ठार झाले. तर हमाली काम करणारा एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि.१० दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवापूर – सामोडे रस्त्यावरील एका मेडिकलसमोरील रस्त्यावर घडली.
वैभव दसपुते व अहमद शेख महंमद पठाण (वय ४८, रा. रोशननगर, पिंपळनेर) हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १८-०) पिंपळनेरकडून सामोडेकडे जात होते. त्याचवेळी वादळी वारा सुरू झाला. वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेले लिंबाचे झाड दुचाकीवर कोसळले. एक मोठी फांदी वैभव दशपुते यांच्या अंगावर पडल्याने दबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अहमद शेख महंमद या तरुणाच्या अंगावर फांदी पडल्याने तो देखील गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी वैद्यकीय सूत्रांनी वैभव दशपुते यांना तपासणीनंतर मृत घोषित केले तर शेख अहमद यास प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
मृतक शिक्षक वैभव दशपुते हा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, दोन बहिणी, काका असा परिवार आहे. रस्त्यावर कोसळून पडलेले निंबाचे झाड जेसीबीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असून एका बाजूने सामोडे चौफुली ते आमदार कार्यालयापर्यंत रस्ता जेसीबीने खोदून ठेवला आहे. यात एका झाडाच्या मुळ्या तुटल्याने हे झाड केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेत एका शिक्षकांचा नाहक बळी गेला. नागरिकांनी संबंधित रस्ता बांधकाम ठेकेदारावर रोष व्यक्त करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
















