वरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समितीच्या उपआवारासमोरील जुन्या महामार्गावर ट्रॅक्टरने स्कूटीला दिलेल्या धडकेत एक महिला ठार, तर मुलगा जखमी झाला. ममता जुंबळे (धनगर) (वय २५, रा.जगदंबा नगर, वरणगाव), असे मयत महिलेचे नाव आहे. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी राजेंद्र जुंबळे यांचा मुलगा कृष्णल दुय्यम उपबाजार समितीच्या आवारातील चाटे इंग्लिश स्कूलमध्ये चौथीत शिकतो. त्यांची पत्नी ममता जुंबळे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुलाला सोबत घेऊन स्कुटीने (क्रमांक एमएच.१९-बीझेड.१०५७) घराकडे येण्यास निघाल्या. महामार्ग ओलांडत असताना वरणगावकडून मुक्ताईनगरकडे राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच.३४.एल.७११३) स्कुटी धडक दिली. त्यात ममता जुबंळे या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने जागेवरच मृत झाल्या. तर स्कुटीवर मागे बसलेला चिमुकला बाजूला फेकला जावून जखमी झाला. याप्रकरणी रवींद्र गोविंदा धनगर (रा.विकास कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहे.