मुंबई (वृत्तसंस्था) तीन दिवसापासून खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच मात्र, समोर भयावह दृश्य होते. एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह किचनमध्ये पडलेला होता. तपासचक्र फिरवल्यानंतर पतीपासून विभक्त होऊन प्रियकरासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा खून प्रियकरानेच केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर मधु प्रजापती (वय 35) असे मृतक महिलेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर ( श्याम बाग) मधील घरात ही घटना घडली आहे. तीन दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात फरार प्रियकर शबीर (रा. अंबरनाथ) विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मधु आणि आरोपी शब्बीर हे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
या दोघांनी भिवंडीतील कोनगाव भागात गणेश नगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतू १५ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. आरोपी शबीरने धारदार कटरने मधुचा गळा चिरला तसेच दोन्ही हातच्या नसा कापून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दरम्यान, शबीर हा मधुच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मैत्रीण अनिता हिने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात शबीर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने संशयित आरोपी शबीर हा पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचे पथकाने रुग्णालयात आवारात वेषांतर करून सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.