अजमेर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील (Rajasthan News) अजमेर जिल्ह्यात लग्नादरम्यान आनंदाच्या भरात केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाचत असताना या तरुणाच्या गळ्यालाच गोळी लागली आणि अवघ्या तीन सेकंदात इतका रक्तस्त्राव झाला की तो खालीच कोसळला.
तेथील पाहुणे मित्राच्या शरीरातून वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत तरुण मित्राच्या वरातीत सामील होण्यासाठी दुसऱ्या गावातून आला होता. यानंतर लग्न तर झालं मात्र पोलिसांच्या पहाऱ्यात. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
केकडी पोलिसांनी सांगितलं की, सुरजपूरा गावात लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. वरात विवाह स्थळी पोहोचणारच होती. दरम्यान पाहुणे बँडवर नाचत होते. नवरदेवाचे मित्रदेखील वरातीत नाचत होते. यादरम्यान कोणीतरी दोन वेळा गोळीबार केला. सुरुवातील पाहुणे घाबरले. नंतर लक्षात आलं की, लग्नाच्या आनंदात गोळीबार केला जात आहेत. तोपर्यंत सर्व ठीक होतं. यानंतर आणखी एकदा गोळी चालवली आणि ती गोळी थेट सोनूच्या मानेत घुसली. रक्तबंबाळ अवस्थेत सोनू अवघ्या काही सेकंदात खाली कोसळला. यानंतर मित्रांनी कपडा दाबून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याबाबत पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. लग्नात फायरिंग करणारा तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दुसरीकडे लग्न पार पडलं मात्र शोककून अवस्थेत.