धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाला काही जणांनी किरकोळ वादातून मारहाण केल्याप्रकरणी ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात भुषण सुरेश भागवत (वय 32 वर्षे, धंदा वर्कशप रा. भावे गल्ली, धरणगाव) यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. भूषण भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना एका मोटर सायकलवर चार मुले भरधाव वेगात परीहार चौकाकडून धरणी भागाकडे जात होते. त्यांच्या मोटार सायकलने भूषण यांना कट मारला. त्यामुळे आधीच केसतोडा झालेला असल्याने पुळ फुटून रक्त निघाले. यामुळे भूषण भागवत यांनी संबंधित दुचाकीवरील मुलांना गाडी एवढी जोरात का चालवताय?, असे विचारले. याचाच राग आल्याने संबंधित मुलं भूषण यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करुन मारहाण केली.
यानंतर भूषण यांना कुटुंबीयांनी घरात घेत दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर ही संबंधित मुलांसोबत इतरांनी घरात घुसण्याचा प्रयत्न करत दरवाजावर दगडफेक करून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रात्री उशिरा जहीर (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या सोबतच्या 60 ते 70 लोकांविरुद्ध भादवि कलम १४३, १४७. ३२३, ३५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील हे करीत आहेत.