जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळ एका रिक्षा चालकाने २३ वर्षीय मुलाला किरकोळ कारणावरून मारहाण करत, त्याच्या हाताच्या दंडावर चाकुने वार केल्याची घटना बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील धीरज राजाराम पाटील (वय-२३) हा तरुण बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेवक मंदिर येथे दर्शनाला गेला हाता. दर्शन घेतल्यानंतर घरी जात असताना, मंदिरासमोरील रस्त्यालगत मयुर उत्तम पाटील या रिक्षा चालकाने धीरजला माझ्याकडे का पाहतोय..? असे म्हणत जाब विचारला. त्यावर धीरजने पाहत नसल्याचे सांगितले. मात्र, रिक्षा चालकाने वाद घालून, धीरजला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकुने वार करत, धीरजला जखमी केले. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुलाब माळी हे करत आहेत.