जळगाव (प्रतिनिधी) सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एकत्रीत रक्कम रुपये ३५ हजार दंड सुनावण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ७ मार्च २०१८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (वय २२ रा. श्रीराम नगर, सिंधी कॉलनी पाचोरा, ता. पाचोरा) याने पिडीत बालिकेला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलुन त्याच्या घरात घेवून गेला होता. त्यानंतर तिच्या अंगावरील कपडे काढून आरोपीने तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याबाबतची फिर्याद पिडीतेच्या आईने पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयासमोर सदर खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारपक्षाच्यावतीने एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात ७ वर्षांची पिडीता, तिची आई, तपासी अंमलदार व डॉक्टर आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तपासी पोलिस अधिकारी दत्तात्रय नलावडे यांनी योग्य प्रकारे तपासाचे काम केल्यामुळे तसेच सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
आरोपी भैय्या गायकवाडला भा.दं.वि. कलम ३७६(२) (एफ) (आय), ३५४-अ, ३५४-ब आणि बाल लैंगीक अत्याचार अधिनियम लै.अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ प्रमाणे दोषी धरुन शिक्षा सुनावण्यात आली. भा.द.वि. कलम ३७६(२)(एफ)(आय) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ साठी दहा वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व रुपये २५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भा.द.वि. कलम ३५४-अ साठी दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भा.द.वि. कलम ३५४-ब साठी तिन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील केतन जे. ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. सात वर्ष वयाच्या बालिकेसोबत केलेले हे कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे असल्याचा युक्तिवाद खटल्याच्या वेळी करण्यात आला. न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपी भैय्या भरत गायकवाड यास दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. विजय गोरखनाथ पाटील यांनी सहकार्य केले.