जळगाव (प्रतिनिधी) चुलत बहिणी असलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राज संतोष कोळी (वय १९, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव) या नराधमाला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एन. राजूरकर यांनी बुधवारी या घटनेचा दिला.
जळगाव खुर्द येथील राज संतोष कोळी याने दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारे ६ व ७ वर्ष वय असलेल्या दोन्ही चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने दोघ अल्पवयीन बहिणींवर लैंगीक अत्याचार केला होता. दोन्ही बहिणींना झालेला प्रकार आपल्या आईला सांगित्यानंतर या घटनेला वाचा फुटली होती. आईने दोन्ही मुलींना सोबत घेत थेट नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती, त्यानुसार राज कोळी याच्याविरुध्द कलम ३७६ ए-बी तसेच पोक्सो कलम ४, ६, ८ व १० नुसार गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीशांना सांगितली जशीच्या तशी घटना !
हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालला. यामध्ये दोन्ही पीडितांनी न्यायालयात घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली, त्यामुळे त्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. विशेष सरकारी वकिल तथा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन सरकारपक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
अशी सुनावली शिक्षा
कलम ३७६ एबीनुसार २० वर्ष सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४ अन्वये १० वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड तर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ५ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.