धुळे (प्रतिनिधी) शहरातील आग्रा तहसील कार्यालय परिसरात मोटारसायकल चालकाकडे सर्व कागदपत्रे असताना २०० रुपयांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. उमेश सूर्यवंशी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराने शहर वाहतूक शाखेच्या नावाने तक्रार केली होती. यानंतर सूर्यवंशी हे जाळ्यात अडकले. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव येथील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कामानिमित्ताने नेहमी मोटारसायकलने शहरात यावे लागते; परंतु तहसील कार्यालय अथवा औलो उर्दू शाळेजवळ थांबणारे शहर वाहतूक शाखेचे काही कर्मचारी ऑनलाइन दंड नको असेल तर पैशांची मागणी करतात, अशी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. बुधवारी तक्रारदार नेहमी प्रमाणे या मार्गाने येत असताना त्यांना हेडकॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी अडवले. ऑनलाइन दंड नको असेल तर २०० रुपयांची मागणी केली. यानंतर २०० रुपयांची लाच घेत असताना हेडकॉन्स्टेबल सूर्यवंशीला एसीबीच्या रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात धुळे शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.