रावेर (वृत्तसंस्था) आजारी नातीला पाहण्यासाठी जात असलेल्या आजीचा वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सावदा बऱ्हाणपूर मार्गावर घडली. मरियम पिंजारी असे या दुर्दैवी मृत आजीचे नाव आहे.
मरियम पिंजारी यांची नात आजारी असल्याने तिला बऱ्हाणपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. तीला पाहण्यासाठी रोझोदा येथील शरीफ रमजान पिंजारी हे पत्नी मरियम यांच्यासह दुचाकीने निघाले होते. सावद्याकडून बर्हाणपूरकडे भरधाव वेगात मागून आलेल्या कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला डोक्यावर पडल्याने तिच्या मेंदूस गंभीर दुखापत होवून ती जागीच ठार झाली तर शरीफ पिंजारी यांच्या पायास दुखापत झाली.
महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी रूग्णवाहिकेस पाचारण करून दोघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी महिलेस मृत घोषित केले. तर त्यांचे जखमी पतीवर औषधोपचार केले. दरम्यान, शरीफ रमजान पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.