जळगाव (प्रतिनिधी) सावदा- पिंपरुड दरम्यान दोन कारचा भीषण अपघात झाला. मुलाच्या लग्न समारंभाच्या (रिसेप्शन) पत्रिका वाटपासाठी जळगावला येत असलेल्या भावना भरत सुपे (वय ४०, रा. वाघोदा ता. रावेर) यांच्या चारचाकीला ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात भावना सुपे जागीच ठार झाल्या तर पाच जण जखमी झाले आहे.
तालुक्यातील वाघोदा येथील केळीचे व्यापारी भरत सपे यांच्या मुलाचे लग्न झाले होते. त्यानिमित्ताने ५ डिसेंबर रोजी सावदा येथे कार्यक्रमाचे (रिसेप्शन) चे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पत्नी भावना भरत सपे. त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी विद्या काशिनाथ सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे (तिघे रा. मोठे वाघोदा) जळगाव येथे पत्रिका वाटपासाठी येत होते. त्याचवेळी रावेर येथील व्ही. एस. नाईक विद्यालयाचे चेअरमन विठ्ठल नाईक यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक (वय ४०), प्रतीक हेमंत नाईक (वय २०), प्रीती हेमंत नाईक (वय १८) हे तिघेही लग्न समारंभ आटोपून जळगावकडे जात होते. यावेळी ओव्हरटेक करताना दोन्ही कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, जीपचा चक्काचूर झाला आहे. लिंबाचे दोन वृक्ष तोडून तिसऱ्या वृक्षावर आदळून शेजारच्या शेतात एक चारचाकी फेकली गेली. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस हवालदार उमेश पाटील व संजय चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
आरसीपी प्लाटूनने केली मदत
घटना घडली त्यावेळेला जळगाव पोलिसांचे आरसीपी प्लाटून सावदामार्गे रावेर येथे जात होते. ही घटना पाहून ते तातडीने थांबले. क्षणाचाही विलंब न करता पोलीस व्हॅनने तसेच सावदा येथील गजानन लोखंडे यांच्या गाडीतून जखमीना तत्काळ दवाखान्यात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचला.