जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी व्ही सेक्टरमधील स्वॉमी पॉलिटेक या प्लॅस्टिक मोल्डेड फर्निचर बनविणार्या कंपनीतून चोराने साडेबारा लाखांची रोकड लंपास केली. हा प्रकार (दि.२ऑक्टोबर) रोजी घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीस ४ दिवसात अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद अरूण वाघोदे (वय-२२ रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक ता. मोताळा जि.बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी) असे आरोपीचे नाव असून त्याला (दि.५) रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीसांनी बोदवड येथून अटक केली आहे. एमआयडीसी व्ही सेक्टरमध्ये व्ही.23 येथे स्वामी पॉलिटेक नावाची कंपनी आहे. दोन शिप्टमध्ये या कंपनीत काम चालते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर ऑफिस असून ऑफिसच्या बाजूला भरत हरिषकुमार मंधान रा. गोदडीवाला हौसिंग सोसायटी मोहाडी रोड यांचे मावसभाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी यांची कॅबीन ओ. या कॅबीनमधील कपाटात फेरीवाल्यांकडून जमा झालेली रोकड ठेवण्यात येते. 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता भरत मंधान व त्यांचा भाऊ वासुदेव पमनानी यांनी तीन ते चार दिवसांपासून फेरीवाल्याकडून जमा झालेली 12 लाख 68 हजार एवढी रोकड कपाटात ठेवली होती. यानंतर दुसर्या शिप्टमध्ये काम करणार्या कामगारांना सुचना देवून मंधान व त्यांचा भाऊ दोघेही घरी निघून गेले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेर्यात अज्ञात चोरटा कैद होता. 6 फुट उंच व शरीराने सडपातळ अनोळखी व्यक्ती तोंडाला माक्स लावलेला हा 2 रोजी पहाटे 2.41 वाजेच्या सुमारास कॅबीनचा स्कू्र ड्रॉयव्हरच्या मदतीने दरवाजा तोडतांना, यानंतर कॅबीनमध्ये उडी मारतांना, यानंतर 3.31 मिनिटांनी पुन्हा परत जातांना दिसून येत असून त्यांच्या हातात रोकड असलेली कापडी पिशवीही दिसून येत आहे. याप्रकरणी भरत मंधान यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सतिष गर्जे या पथकाला रवाना केले होतो. संशयित आरोपी अरविंद अरूण वाघोदे (वय-२२) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक ता. मोताळा जि.बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी जळगाव हा ४ ऑक्टोबर रोजी बोदवड परिसरातील जंगलात असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यातील ९ लाख ८ हजार ३०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे. आज न्यायालयात हजर केले असता ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ रतीलाल पवार करीत आहे.