पणजी (वृत्तसंस्था) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारे तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. २०१३ मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता.
एका महिलेनं तरुण तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१३ मध्ये त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांना जामिन मंजूर झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी २०१४ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात २,८४६ पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.
अतिरिक्त जिल्हा कोर्ट २७ एप्रिल रोजी निकाल जाहीर करणार होतं. परंतु, न्यायाधीश क्षमा जोशी यांनी या प्रकरणावरील निर्णयाला १२ मे पर्यंत स्थगिती दिली होती. १२ मे रोजी पुन्हा एकदा याप्रकरणावरील सुनावणी १९ मेपर्यंत पुढे ढकलली होती. कोर्टानं कारण देत सांगितलं होतं की, कोरोना महामारीमुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तरुण तेजपाल यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही आपल्यावरील आरोप सिद्ध होण्याविरोधात दाद मागितली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
२०१३ मध्ये तेजपाल यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणीने त्यांच्यावर गोवातील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचे आरोप लावले होते. ३० नोव्हेंबर २०१३ ला तेजपाल यांना अटक झाली होती. मे २०१४ पासून तेजपाल जामीनावर होते.
कोणत्या कलमांतर्गत खटला चालू होता?
तेजपाल यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३४१, ३४२ (चुकीच्या पद्धतीने अडवणूक), ३५४ (सन्मान भंग करण्यासाठी छळ), ३५४ – ए (लैंगिक शोषण), ३५४ बी (महिलेवर अत्याचार किंवा शक्तीचा वापर), ३७६ ( २) (एफ) आणि (के) (उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून महिलेवर बलात्कार) असे आरोप दाखल करण्यात आले होते.