मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी-अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार रुटिन चेकअपसाठी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा असून रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सायरा बानो यांनी वर्तवली.
“दिलीप साब यांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळेल” असं सायरा बानो यांनी सांगितलं. कोरोनाचा काळ असल्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला होता. सायरा बानो यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या वाढदिवशी गरजूंना दान केले होते. दिलीप कुमार यांनी २८ एप्रिलला ट्वीट केले होते. “सर्वांनी काळजी घ्या, मी सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, आपण लवकरच कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळवू” अशा आशयाचं ट्वीट दिलीप कुमार गेल्या काही काळात करत आहेत.
दिलीप कुमार यांच्या दोघा धाकट्या भावांचा गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झाला. ८८ वर्षीय अस्लम खान यांचे २१ ऑगस्ट रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. तर बारा दिवसांनीच (चार सप्टेंबर) ९२ वर्षांच्या एहसान खान यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी दिलीप कुमार यांना घरीच आयसोलेट करण्यात आले आहे.