भंडारा (वृत्तसंस्था) अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथे मंगळवारी (१० ऑक्टोबर) घडली. मधमाश्यांच्या भीतीने नागरिकांनी मृतदेह सोडून पळ काढला. यात १५ जण जखमी झालेत.
हरदोली झंझाड येथील मारोती कबल गायधने यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी गावाजवळील स्मशानभूमीत गेले होते. अंत्यसंस्काराच्या विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला होता.
अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले नागरिक भयभीत झाले आणि मृतदेह स्मशानभूमीतच सोडून वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. मधमाश्यांच्या हल्ल्यात १५ जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी पुढे असा प्रकार घडू नये, यासाठी मधमाश्यांचा पोळ गावातील व्यक्तींकडून काढून घेतला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.