लातूर (वृत्तसंस्था) चार मजली इमारतीत लागलेल्या आगीमुळे प्रचंड धूर निर्माण झाला होता. आजूबाजूला शॉपिंग कॉम्पलेक्स आणि बाजारपेठ असल्याने मोकळी जागाही नव्हती. त्यामुळे धुरात गुदमरून आई मुलगा आणि सून हे तिथे मृत्युमुखी पडले. सुनील शिवाजीराव लोंढे (वय ५८), कुसूमबाई शिवाजीराव लोंढे (वय ८०) आणि प्रमिला सुनील लोंढे (वय ५०), अशी मयतांची नावे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्यावर शिवाई नावाची इमारत आहे. बहुमजली असलेल्या या इमारतीत खालच्या दोन मजल्यांवर व्यावसायिक दुकाने व वरच्या दोन मजल्यांवर सदनिका तयार करण्यात आल्या आहेत. या इमारतीतील एका सदनिकेत सुनील शिवाजीराव लोंढे (वय ५८) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. गुरूवारी सकाळी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यातील फुलांचे हार, बुके याच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले. यामुळे दुकानातील प्लास्टिक व कागदी साहित्याने पेट घेतला. सकाळच्यावेळी पेट घेतल्याने दुकानेही बंद होती.
दुकानातील साहित्य पेटण्याने धुराचे लोट सुरू झाले. त्याचबरोबर वायरिंगचे शॉर्ट सर्किट होत संपूर्ण इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत गेले. खालच्या मजल्यातील प्रचंड धुरामुळे आगीच्या ज्वाळाही भडकू लागल्या. त्यांना वाटच मिळत नसल्याने इमारतीच्या जिन्यावरून या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत भडकत गेल्या. वायरच्या जळण्याने उग्र वास व धुराचे लोट इमारतीत निर्माण झाल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. हे भयावह दृश्य पाहून दुसऱ्या मजल्यावर राहणारे मयत सुनील लोंढे हे त्यांच्या आई कुसूमबाई लोंढे व पत्नी प्रमिला लोंढे यांना सोबत घेऊन पायऱ्यांतून खाली येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु, धुराचे प्रचंड लोट व आगीच्या ज्वाळांचेही निखारे येत असल्याने पायऱ्या उतरत असतानाच तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह पायऱ्यांवरच असल्याचे अग्निशामकच्या जवानांना दिसून आले.
घटना घडताच अवघ्या दहा मिनिटात अग्निशामक विभागाची गाडी आग विझविण्यासाठी दाखल झाली. त्यांनी खालच्या मजल्यावरील आग विझविली. परंतु, धुराचे लोट असल्यामुळे त्यांनाही वरच्या मजल्यावर जाता आले नाही. धूर कमी झाल्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाटेतच सदर तिघांचे मृतदेह आढळून आले. यादरम्यान धुराचे लोट पाहून शेजारच्या घरातील तिघांनी गॅलरीच्या लोखंडी पाईपला साडी बांधून खाली येण्याचे धाडस दाखविले.