चाळीसगाव (प्रतिनिधी) रस्त्यावर बसलेल्या कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून कार उलटली. या अपघातात कारमधील ४७ वर्षीय महिलेला जागीच मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव- नागद रस्त्यावरील हातले गावाजवळ घडली.
चाळीसगाव येथील मेडिकल व्यावसायिक तथा हनुमानवाडी भागातील रहिवासी संदीप ताराचंद बेदमुथा हे नागद येथील भावाला भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह कारने चाळीसगाव येथून नागद जाण्यासाठी निघाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हातले गावाजवळ वीटभट्टीसमोर रस्त्यावर कावळा बसलेला होता. संदीप बेदमुथा त्याला वाचवण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्यावर उलटली.
कार उलटून झालेल्या अपघातात संदीप बेदमुथा (वय ५०), कांचन संदीप बेदमुथा (वय ४७), सायराबाई ताराचंद बेदमुथा (वय ७५), जागृती संदीप बेदमुथा (वय २६) व देवेश संदीप बेदमुथा (वय २०) हे सर्व जण सर्व गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कांचन बेदमुथा यांना मृत घोषित केले. जखमींवर येथील साईकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत दीपक जैन यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
















