धरणगाव (प्रतिनिधी) महावितरणकडून मागील १५ दिवसात थकबाकीदार ग्राहकांचे साधारण ४०० कनेक्शन तोडले होते. ग्राहकांना वीज बिल भरतांना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होता. दरम्यान, या गोष्टीची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेत, ग्राहकांना तीन टप्प्यात वीज बिल भरण्याची सूट देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. यामुळे आता धरणगाव तालुक्यातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव विजबिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या. मात्र, वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. या विरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीची वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला होत होता. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली. ना. पाटील हे आज धरणगावात आले होते. यावेळी त्यांनी पालिकेत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर व धरणगाव अर्बन युनिटचे कनिष्ठ अभियंता एम.बी.धोटे यांची बैठक बोलाविली. यावेळी कोणत्याही ग्राहकाचे विद्युत कनेक्शन अचानकपणे खंडित करू नका. तसेच वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना 40 :30 :30 या प्रमाणे तीन टप्प्यात बिलाची वसुली करा, असे आदेश ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच सध्या आर्थिक अडचणीचा काळ सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडी सूट द्या, अशा सूचना दिल्या. त्यानुसार आता ग्राहकांना वीज बिल तीन टप्प्यात भरता येणार आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता आर. एस पवार यांनी थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणगावची मागील वर्षी असलेली १० लाखाची थकबाकी यावर्षी सव्वा कोटी रुपयापर्यंत गेली असल्याचे सांगितले. यावेळी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे, मराठा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.