कोल्हापूर (वृत्तसंस्था) येथील एका वृद्ध दाम्पत्यानं रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित दाम्पत्यानं दीर्घ आजाराला (long illness) कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विजयमाला पाटील (वय ७५) आणि धोंडिराम बळवंत पाटील (वय ८०) असं आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. ते मूळचे कोल्हापुरातील महाडिक वसाहतीतील रहिवासी असून सध्या जाधववाडी परिसरात वास्तव्याला होते. मृत धोंडिराम पाटील याचं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जुन्या काळातील न्यू आनंद सायकल नावाचं दुकान होतं. पण काही दिवसांपूर्वी आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांनी महाडिक वसाहतीतील आपलं घर विकलं आणि मुलांसह पाटोळेवाडीत राहायला आले.
पण वृद्धापकाळात दोघांनाही दीर्घ आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे ते आजाराला त्रासले होते. विजयमाला यांना फिट येण्याचा त्रास होता. यातूनच शनिवारी सायंकाळी दोघंही रंकाळा परिसरात तलाव फिरण्यासाठी आले होते. याच रात्री दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडून तलावात उडी मारून आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी विजयमाला यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. मृत विजयमाला यांची ओळख न पटल्यानं पोलिसांनी बेवारस मृत्यूची नोंद करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात ठेवला. दरम्यान सोमवारी सायंकाळी धोंडिराम पाटील यांचा मृतदेहही याचठिकाणी आढळला. यावेळी पोलिसांनी पाटील यांचे खिशे तपासले असता, त्यांच्या खिशात दोघांचेही ओळखपत्र आढळले. त्यावरून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती त्यांच्या मुलांना दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.