जळगाव प्रतिनिधी : यूट्यूब रिल्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवित देविदास बारीकराव पाटील (वय ४४, रा. वावडे, ता. अमळनेर) या सैन्यातील जवानाला २४ लाख ८२ हजार रुपयात ऑनलाईन गंडविले. ही घटना दि. २२ सप्टेंबर २०२५ पासून आतापर्यंत घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील देविदास बारीकराव पाटील (वय ४४) हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे नोकरीला आहेत. दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी ते यूट्यूबवर रिल्स पाहत असताना, त्यांना २२ हजार रुपये गुंतवल्यास पैसे दुप्पट होतील, अशी एक लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण डेहराडून येथून बोलत असून मॉरिशस येथील ‘ट्रेडग्रीप’ नावाच्या शेअर मार्केट कंपनीशी संबंधित असल्याचे भासवले. ऑनलाईन ठगांनी पाटील यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील करून ‘ट्रेडग्रीप क्लाईट’ नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले.
अधिक नफा दाखवित केला विश्वास संपादन
सुरुवातीला २० हजार ९९९ रुपयांच्या गुंतवणुकीवर १, हजार ३३१ रुपये नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी पाटील यांना विविध शेअर्समध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २४ लाख ८२ हजार २५६ रुपये भरण्यास प्रवृत्त केले.
पैसे न भरल्यास केस करण्याची धमकी
जेव्हा पाटील यांनी आपली मूळ रक्कम आणि नफा परत मागितला, तेव्हा आरोपींनी त्यांना आणख ५ लाख रुपये भरण्यास सांगितले. ‘जर पैसे भरल नाहीत, तर तुमचा पोर्टफोलिओ स्क्रॅप होईल आणि कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी तुमच्यावर के करू,’ अशी धमकीही त्यांना देण्यात आली.
सायबर पोलिसात दिली तक्रार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंत जळगाव सायबर पोलिसांनी याप्रकरणी संबधितांव गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे करत आहेत.
















