गडहिंग्लज (वृत्तसंस्था) गडहिंग्लज येथील अर्जुन रिफायनरीज प्रा. लि. चे मालक संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी नैराश्येपोटी व तणावाखाली स्वतःची पत्नी तेजस्विनी शिंदे (वय ३६) व मुलगा अर्जुन शिंदे (वय १४) यांचा गळा चिरून स्वतः विष प्राशन करून गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवार, दि. २३ रात्री ११ ते शनिवार, दि. २४ पहाटे ५ दरम्यान घडली. शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली ते जेलमध्ये देखील जाऊन आले होते. यानंतर ते तणावाखाली होते. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भाचा उठवायला गेला अन…!
शिंदे दररोज पहाटे ५ वाजता व्यायामासाठी व फुटबॉल खेळण्यासाठी जात होते. फुटबॉल खेळण्यासाठी दररोज त्यांचा मुलगाही जात होता. नेहमीप्रमाणे ते ५ वाजता ते उठले नसल्यामुळे ६ वाजेच्या सुमारास त्यांचा भाचा शुभम याने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या खोलीला असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले असता तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याने आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक जमा झाले. तत्काळ पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. खोलीचा दरवाजा मोडून काढल्यानंतर खोलीतील दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. त्या खोलीत चाकू व कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्यात.
विष पाजून चिरला गळा !
प्राथमिक अंदाजानुसार मानसिक तणावातून त्यांनी सुरुवातीला त्यांनी स्वतःचा मुलगा व पत्नीला विष पाजून त्यांचा गळा चिरून त्यानंतर स्वतः विष प्राशन करून स्वतःचाही गळा चिरला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुलाच्या व पत्नीच्या गळ्यावरील घाव खोलपर्यंत होते. ही घटना वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली आणि गडहिंग्लजसह परिसरातील लोक शिंदे यांच्या घरासमोर जमू लागले. बघता बघता तासाभरात सुमारे हजार ते पंधराशे लोकांचा जमाव जमला आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यास कारणीभूत असलेल्या लैला-मजनूला अटक करावी, या मागणीसाठी उत्स्फूर्तपणे गडहिंग्लज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनी निषेधाच्या तसेच त्या दोघांना अटक करण्याच्या घोषणा दिल्या.
माजी नगरसेविका आणि एक जण द्यायचा त्रास !
कर्नाटकात नोंद असलेल्या बलात्कार प्रकरणातील फिर्यादी माजी नगरसेविका व तिचा मजनू हे शिंदे यांना मानसिक त्रास देत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या त्रासातूनच शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात होते. ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे शिंदे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांची आई, बहीण, नातेवाईक व मित्रमंडळींनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा संशयित माजी नगरसेविकेच्या काही नातेवाइकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दोघं संशयित फरार !
शिंदे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अडकवणाऱ्या संशयित माजी नगरसेविका लैला व तिचा मजनू यांना अटक केल्याशिवाय गडहिंग्लजकर स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला. ही घटना कळताच संशयित चारचाकी घेऊन फरार झाले आहेत. विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत; पण रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. संतोष शिंदे यांनी अतिशय कष्टातून व संघर्षातून अर्जुन बँडचे नाव कमावले होते. अतिशय अल्पावधीत हा ब्रँड त्यांनी नावारूपाला आणला होता.
काय म्हटले आहे सुसाइड नोटमध्ये?
संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्या नगरसेविकेने व राऊत यांनी आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवून १ कोटीची खंडणी मागितल्याचेही शिंदे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. बाणेकर व पाटे यांनी आपल्याकडून घेतलेले ६ कोटी ५० लाख रुपये मागूनही परत न दिल्यामुळे त्यांनाही आपल्या आत्महत्येला जबाबदार धरावे. स्कूलबस दारातून येत असताना ‘ती’ नगरसेविका मुलगा अर्जुन याच्याकडे रागाने बघायची आणि हाताने इशारे करून त्याला मारून टाकते, असे धमकवायची. त्यामुळे मानसिक धक्का बसल्याचे संतोष यांनी चिठ्ठीत म्हटले असल्याचे शुभम बाबर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.