रत्नागिरी (वृत्तसंस्था) केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानं रत्नागिरी हादरल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीमध्ये घडली आहे. या स्फोटात तीन कर्मचारी जळून ठार झाले तर तिघेजण अतिगंभीर जखमी झाले.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे आग लागली आणि तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण जळून जागीच ठार झाले. त्यांचे चेहरे पूर्ण भाजले असल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. अन्य तिघेजण अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम लगेचच हाती घेण्यात आले. मात्र तोपर्यंत बरेच नुकसान झाले आहे.