जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय जवळील पाटील नर्सरी समोर अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील शेख मेहमूद शेख रज्जाक (वय ५०) व राजेंद्र भादू डोळे (वय ४२, दोन्ही रा. सावदा ता. रावेर) हे दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
यासंदर्भात अधिक असे की, सावदा येथील रहिवासी शेख मेहमूद शेख रज्जाक यांचा भाचा हा जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. भाच्याला पाहण्यासाठी ते गावातील मित्र राजेंद्र डोळे यांच्यासह दुचाकीने शुक्रवारी सकाळी सावधाहून जळगावसाठी निघाले. डॉ. उल्हास पाटील रुग्णालय जवळील पाटील नर्सरी समोरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात शेख मेहमूद व राजेंद्र डोळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे दुचाकीचेही नुकसान झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नंतर शववाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास मनोज इंद्रेकर करीत आहेत.