एरंडोल (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत पिंप्री बुद्रुक ता. एरंडोल येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वराड खुर्द गावाजवळ घडली.
एरंडोल तालुक्यातील पिंप्री येथील सुनील उर्फ भैय्या पाटील हे सकाळी ९.३५ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासह शेतात गेले. त्या ठिकाणी महिलांना शेतातील कामे सांगून फवारणीचे औषध घेण्यासाठी दोघेही दुचाकीने जळगावकडे निघाले. जळगाव येथे जात असताना वराड बुद्रुक जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. दुचाकी धडक देण्याऱ्या गाडीसह जवळपास १२ फूटापर्यंत फरफटत गेली.
या अपघातातील जखमी सुनील पाटील यांना तत्काळ रिक्षातून रुग्णालयात रवाना करण्यात आले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुनील पाटील हे प्रदीप रामचंद्र पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एस. आर. पाटील त्याचा मुलगा या वेळी सुनील पाटील यांच्यासोबत होता. भाजपचे तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील यांचे सुनील पाटील हे पुतणे होत. घटनेची माहिती मिळताच दोन्ही गावांचे पोलीस पाटील विक्रम पाटील, राजू वाढले, सोनू पाटील, ईश्वर बापू पाटील, आप्पा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.