मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीची आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल सीबीआय पथकाने चौकशी केली. तसेच त्यांची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान सीबीआयला अद्यापही पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सीबीआयने समन्स बाजवल्यानंतर त्यानुसार काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास अनिल देशमुख सीबीआयच्या सांताक्रूझ येथील अस्थायी कार्यालयात पोहचले. देशमुख यांच्या चौकशीआधी सीबीआयने सचिन वाझे, वाझेचे दोन चालक, देशमुख यांचे स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे व संजीव पलांडे तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या सर्वांच्या चौकशीत हाती आलेल्या माहितीच्या आधारे देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांद्वारे त्यांची उलट तपासणी करण्यात आली. १०० कोटी रुपयांची खंडणी खरंच मागण्यात आली होती का, असल्यास कुठल्या प्रकारे वसुली केली जात होती, यात कोण कोण सहभागी होते, आदी प्रश्न यावेळी अनिल देशमुख यांना विचारण्यात आले. रात्री ८ वाजताच्या सुमारास ही चौकशी संपली. परंतु, अद्यापही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे देशमुख यांना पुन्हा समन्स बजावले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात सीबीआयकडून पोलीस अधीक्षक दर्जाचे अभिषेक दुलार व किरण एस. हे दोघे चौकशी पथकाचे प्रमुख आहेत.