न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) अमेरिकेतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या कांस्य पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथील युनियन स्क्वेअरजवळ असणाऱ्या या ८ फूट उंच पुतळ्याची तोडफोड केली आहे.
अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दुतावास हा घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांमध्ये निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
महात्मा गांधींच्या ११७ व्या जन्मतिथीला २ ऑक्टोबर १९८६ रोजी हा ८ फूट उंच पुतळा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनकडून भेट म्हणून देण्यात आला होता. योगायोगाने, पुतळा २००१ मध्ये काढून टाकण्यात आला, २००२ मध्ये एका लँडस्केप गार्डन परिसरात तो पुन्हा उभारण्यात आला.