नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव्हमध्ये एका भारतीय (indian student coming from kyiv got shot) विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. या विद्यार्थ्याला तातडीने कीव्ह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माध्यमांशी बोलताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (MOS) जनरल व्हीके सिंग यांनी पोलंडच्या रझेझो विमानतळावर असताना ही माहिती दिली आहे. जनरल सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, कीवमध्ये राहत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “भारतीय दूतावासातील सर्वांनी याआधीच कीव सोडले पाहिजे, असे प्राधान्याने स्पष्ट केले होते. युद्धाच्या प्रसंगी बंदुकीची गोळी कोणाचाही धर्म आणि राष्ट्रीयत्व पाहत नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.
हे विद्यार्थी सध्या युक्रेनमधून युद्धग्रस्त देश सोडून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्हीके सिंग युक्रेनला लागून असलेल्या देशांतील स्थलांतराच्या प्रयत्नांवर सातत्याने देखरेख करत आहेत.