मुंबई (वृत्तसंस्था) नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. तुरुंगात पाणी देखील दिलं गेलं नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन राणा यांच्या आरोपाला उत्तर दिलं होतं. आता शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी आणखी व्हिडीओ समोर येणार असल्याचं म्हटलं आहे. राणा दाम्पत्यासंदर्भातील आणखी व्हिडीओ पोलिसांकडून समोर येतील, असं तुमाणे म्हणाले आहेत.
कृपाल तुमाणे यांनी पोलिसांकडून काही व्हिडीओ आज प्रसिद्ध केले जातील, असं म्हटलं आहे. राणा यांनी पोलिसांवर आणि सरकारवर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पोलिसांकडून व्हिडीओ जारी केले जाणार आहेत. राणा दाम्पत्यानं परमेश्वराच्या नावावर खोटं बोलण्याचं काम केलं, असा आरोप तुमाणे यांनी केला आहे.
राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये राज्य सरकार त्यांची बाजू मांडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घरचं जेवण मिळावं यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. राणा दाम्पत्याच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.