धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेंतर्गत धरणगाव शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना “मैं भी डिजिटल ४.०” मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन धरणगाव नगर परिषदकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना
पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे हे आहे. लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करतांना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे. याकामी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे.
एनयूएलएम विभागाशी संपर्क साधावा
धरणगाव शहरात दि. ०७ फेब्रुवारी २०२३ ते दि. १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत “मैं भी डिजिटल ४.०” नावाची मोहीम राबविणेत येत आहे. त्यानुसार पीएम-स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्यापपावेतो डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथ विक्रेत्यांनी आपल्या नगरपरिषदेच्या कार्यालयात NULM विभागात संपर्क साधून डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त डिजिटल ऑन-बोर्डिंगद्वारे मिळणाऱ्या कॅश बॅकचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांनी केले आहे.
















