धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या मंजुरीसाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाळधी येथील दौऱ्यात त्यांनी धरणगाव येथे उपजिल्हा रूग्णालयाची लवकरच निर्मिती करण्यात येणार असल्याचे घोषितही केले होते. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे. उपजिल्हा रूग्णालयासाठी बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आली असून येथे आता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालय बांधकाम केले जाणार आहे. धरणगाव वासीयांची मागणी पूर्ण झाली असल्याने धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले असून धरणगावात पेढे वाटून फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या १९ सप्टेंबर २०२२ व १३ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार उपजिल्हा रूग्णालय मंजुरीसाठी सिव्हील सर्जन डॉ. किरण पाटील यांनी प्रस्ताव सदर केला होता. त्यानुसार १३ मार्च २०२३ ला सहसंचालक आरोग्यसेवा डॉ. विजय कदम बांडे यांच्या प्रस्तावानुसार ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिव व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सादर केला होता.
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात अश्या असतील सुविधा
बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरात होणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया ग्रुह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (TB), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्र द्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.
धरणगाव येथील ग्रामीण रुगालायाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली असून त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करतो. धरणगाव येथे लवकरच ट्रामा केअर सेन्टरला मंजुरी मिळणार असून उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ही लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम प्रक्रियेत आहे.
-पालकमंत्री गुलाबराव पाटील