जयपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुखदेव सिंग गोगामेडी हे मंगळवारी दुपारी १.४५च्या सुमारास श्याम नगर जनपथवरील घराबाहेर उभे होते. याचवेळी एका स्कूटरवरून दोन आरोपी आले आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला. यानंतर आरोपी पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गोगामडी यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुखदेव सिंह यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांच्या सोबत असलेले अजीत सिंह देखील गंभीर जखमी झाले आहेत.
सुखदेव सिंह गोगामडी हे अनेक वर्षांपासून राष्ट्रीय करणी सेनेशी जोडले गेलेले आहेत. त्यांचे करणी सेनेशी अंतर्गत वाद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना केली. या करणी सेनेचे ते अध्यक्ष होते . पद्मावत आणि गॅगस्टर आनंदपाल एनकाऊंटर प्रकरणानंतर गोगामडी चर्चेत आले होते. दरम्यान, या घटनेनंतर मेट्रो मास रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.