पारोळा (प्रतिनिधी) शेतात कचरा टाकल्याच्या कारणावरून चौघांवर प्राणघातक हल्ला करून शिवीगाळ करत दमबाजी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात वैशाली संजय पवार (वय ३५, रा. शास्त्री नगर तासमवाडी ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ जून २०२२ रोजी कल्पनाबाई शिवाजी पवार, रोहित शिवाजी पवार, शिवाजी विक्रम पवार (सर्व रा.तासमवाडी ता. पारोळा) यांनी वैशाली पवार यांच्यासोबत शेतात कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद केला. कल्पनाबाई पवार हिने वैशाली पवार व त्यांचे सासरे रमेश पवार अशा दोघांना मारून जबर दुखापत केली. तर शिवाजी रोहित पवार याने चाकूने राजेंद्र रमेश पवार यांच्या पोटावर छातीवर गालावर व डोक्याच्या मागे वार करून चाकूने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजी विक्रम पवार याने देखील त्याच्या हातातील पावडीने हल्ला केला. वैशाली पवार यांचे पती रमेश बाबुराव पवार यांच्या डोक्यास पाठीवर देखील मारहाणीत मोठी दुखापत झालीय. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहेत.