बोदवड (प्रतिनिधी) शहरातील एका माथेफिरूने त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून एकाची मोटार सायकल आणि चार कुट्टीचे शेड पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील माळीवाडा भागात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना प्रकाश माळी (वय ३४) याने त्याच्या विरुद्ध पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग ठेऊन योगेश सुभाष माळी (वय ३६) यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी रस्त्याने हिरो होंडा (एचएफ डीलक्स क्र.एम एच २० एफके ४२६४ )मोटरसायकलने जाणारे अनिकेत श्रावण उमाळे, गणेश रामा देवरे (रा.रेवती) यांना अडवले व दगडाने मारण्याचा धाक दाखवून पळवून लावले. यानंतर नानाने त्या मोटरसायकलची पेट्रोल नळी काढून त्यातील पेट्रोल बाटलीत घेतले आणि योगेश माळी यांच्या घरासमोरील चाऱ्याने भरलेल्या कुट्टीचे शेड पेटवून दिले. तसेच उरलेले पेट्रोल मोटारसायकलवर टाकून तिला देखील पेटवून दिली. या माथेफिरूने योगेश माळी यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. हा सर्व घटनाक्रम जवळील घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे. याबाबत योगेश माळी यांचे फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
















